सावत्र आईची निर्दोष मुक्तता; बचाव पक्षाचे वकील अॅड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा
बारामती | प्रतिनिधी :
अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आणि तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणात बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडितेला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याच प्रकरणातील सहआरोपी सावत्र आईची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला.
वीटभट्टीवरील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
अभियोगाच्या कथनानुसार, सन २०२२ मध्ये आरोपी वडील आपली अल्पवयीन मुलगी आणि पत्नी यांच्यासह वीटभट्टीवर कामासाठी आले होते. २७ डिसेंबर २०२२ पासून मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
पीडिता गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वीटभट्टी मालकाच्या पत्नीने तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडितेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात सावत्र आईवरही धमकी देणे आणि गुन्ह्यास प्रोत्साहन देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपांनंतर तिलाही अटक करण्यात आली होती.
सावत्र आईची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
सहआरोपी सावत्र आईच्या वतीने अँड. अमोल सोनवणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी लेखी व तोंडी युक्तिवाद करताना प्रत्येक आरोपीविरुद्धचे आरोप आणि उपलब्ध पुरावे स्वतंत्रपणे तपासण्याची आवश्यकता अधोरेखित केली. साक्षीदारांच्या उलटतपासणीतूनही बचाव पक्षाने विविध मुद्दे न्यायालयासमोर मांडले.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षींचा विचार करून न्यायालयाने सावत्र आईची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही प्रत्येक आरोपीची जबाबदारी स्वतंत्रपणे तपासून पुराव्यांच्या आधारे निर्णय घेण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
पीडितेला पाच लाखांची भरपाई
मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याबरोबरच न्यायालयाने पीडितेला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
या खटल्यात अँड.अमोल सोनवणे यांना ऍड. अविनाश जाधव, रितिक गायकवाड, राजरत्न ताकतोडे, वैभव झगडे, राहुल गिरमे, सागर खरात, अँड. रवींद् सोनवणे आणि लीगल एड पॅनेलचे अँड. सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414









