बारामती, प्रतिनिधी : बारामतीतील पालखी महामार्गावर पायलट ढाब्यासमोर राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच लोखंडी सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडे पुढील तपासासाठी सोपवले. न्यायालयाने दोघांना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजण्याच्या सुमारास पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर ही घटना घडल्याची नोंद पोलिसांत आहे. लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीने राणा सूर्यवंशी यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. त्यानंतर लोखंडी सत्तूरने त्यांच्या हातावर आणि पोटाच्या बाजूला वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९(१), ११८(१), ११८(२), ११५(२), ३(५) तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३, ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक विश्लेषणातून तपासाला दिशा
बारामती तालुका पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार, गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर विधी संघर्षग्रस्त बालक आणि पार्थ वासुदेव अवघडे (वय १९ वर्षे) यांना पुणे शहर पोलिसांनी पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुढील चौकशीत ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५० वर्षे), व्यवसाय चालक व मॅनेजमेंट, यांचेही नाव समोर आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. संबंधित व्यक्तींनी या गुन्ह्याच्या कारणासाठी दोन लाख रुपये दिल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी पार्थ वासुदेव अवघडे आणि ज्ञानदेव महादेव शिंदे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या गुन्ह्याचा हेतू आणि इतर संभाव्य सहभागी व्यक्तींबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस करीत आहेत. तपासातून या प्रकरणातील आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414









