बारामती : बारामती तालुक्यातील दीपनगर, काटेवाडी येथे जातिवाचक शिवीगाळ करून कोयता, चाकू आणि उसाने मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद आहे.
या प्रकरणी फिर्यादी अनिल संजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. एफआयआरमध्ये आरोपी म्हणून १) शुभम संतोष करे, २) ओम संतोष करे, ३) अजिंक्य राजाराम पांढरे, ४) शंभू वणवे आणि ५) शंभू जराड यांची नावे नमूद आहेत.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सागर मदने याच्यासोबत झालेल्या पूर्वीच्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन वाद घातल्याचा आरोप आहे. यावेळी जातिवाचक शिवीगाळ व धमकी देण्यात आली. फिर्यादीची पत्नी शैला यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच शुभम करे, ओम करे आणि अजिंक्य पांढरे यांनी कोयत्याने, शंभू जराड याने चाकूने, तर शंभू वणवे याने उसाने मारहाण केल्यामुळे फिर्यादी जखमी झाल्याचा आरोप आहे. आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती मोटारसायकलवरून निघून गेल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे, शस्त्र अधिनियम तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपासाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक चैतन्य वसंतराव कदम यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414









