५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का?
मोरगाव, सुपा, ता. बारामती : बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वढाणे येथील एका गुन्ह्याच्या संदर्भात संशयित आरोपींच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी झाल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित आर्थिक व्यवहारासंदर्भातील मोबाईल ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
संबंधित प्रकरणात ५० हजार रुपयांच्या व्यवहाराचाही उल्लेख असल्याचा दावा होता आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कमी रक्कम मान्य होणार नसल्याच्या आशयाचे संभाषण एका पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचा आरोप आहे. मात्र, या संभाषणाची सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख स्वतंत्रपणे अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही.
वरिष्ठांच्या नावाचा वापर झाला का?
या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून स्वतःहून पैशांची मागणी केली का, की या कथित व्यवहारात अन्य कोणाची भूमिका होती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कथित व्यवहाराची माहिती होती का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी
कथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी तांत्रिक तपासणी करावी, संभाषणातील व्यक्तींची ओळख निश्चित करावी आणि आर्थिक मागणीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे परंतु या प्रकरणात कार्यवाही होणार का हा प्रश्न उपस्थित होता आहे.
आता पोलीस प्रशासनाची भूमिका काय असणार?
या प्रकरणातील आरोपांची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसल्याने चौकशीचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे. आरोप सिद्ध झाल्यास संबंधिता पोलीस कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार का, तसेच या कथित व्यवहारामागील वस्तुस्थिती समोर येणार का?याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414









