गावठी दारू निर्मितीची ठिकाणे उद्ध्वस्त; २ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
बारामती, दि. २८ ऑक्टोबर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती विभागाने अवैध गावठी दारू निर्मितीविरोधात धडक कारवाई करत बारामती तालुक्यातील आठ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, कच्चे रसायन आणि तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ३८ हजार ८०० रुपये असल्याची माहिती विभागाने दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव, मेखळी आणि पावचाकवस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय अधिकारी, अधीक्षक तसेच बारामती, दौंड, सासवड आणि इतर संबंधित पथकांनी बारामती तालुका पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवली.
या कारवाईदरम्यान गावठी दारू निर्मितीची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच सुमारे ११० लिटर तयार गावठी दारू आणि ४,८२० लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. संबंधित मुद्देमाल जप्त करून गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संबंधित अधिकारी करत आहेत. अवैध दारू निर्मितीसाठी कच्चा माल पुरवणारे तसेच या व्यवसायाला आर्थिक किंवा इतर प्रकारे मदत करणारे कोण आहेत, याची माहिती तपासातून पुढे येण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन
पुणे जिल्ह्यातील गावठी दारूमुळे होणाऱ्या दुर्घटना आणि विषारी दारूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे. परिसरात अवैध गावठी दारूची निर्मिती किंवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी संबंधित राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414










