दारू, मटका, गुटखा, जुगार, ऑनलाइन चक्रीसह विविध अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप; कारवाईची नागरिकांची मागणी
बारामती : बारामती शहर आणि परिसरात दारू विक्री, मटका, गुटखा, जुगार, ऑनलाइन चक्री तसेच इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी हे व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे चित्र दिसत असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस प्रशासनाची असताना, अशा प्रकारच्या व्यवसायांना आळा का बसत नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही जर अवैध धंदे सुरूच राहत असतील, तर संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीची चौकशी होण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेषतः मटका, जुगार आणि ऑनलाइन चक्री यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असून, तरुण वर्गही या व्यसनाधीनतेच्या विळख्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अवैध दारू आणि गुटख्याच्या विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
अवैध धंदे इतक्या सहजपणे सुरू राहतात कसे? त्यांच्यावर नियमित कारवाई का होत नाही? कारवाई झाल्यानंतर हे व्यवसाय पुन्हा सुरू होत असतील, तर त्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर देणे आवश्यक आहे.
अलिखित परवानगी’ दिल्याचा आरोप
अवैध धंदे सातत्याने सुरू राहत असल्याने पोलीस प्रशासनाने या व्यवसायांना जणू काही ‘अलिखित परवानगी’च दिली आहे का? असा संतप्त सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासनाने बारामती शहरातील अवैध धंद्यांविरोधात ठोस आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवावी. तसेच यापूर्वी झालेल्या कारवायांचा तपशील, किती गुन्हे दाखल झाले, किती आरोपींवर कारवाई झाली आणि कारवाईनंतर संबंधित ठिकाणी पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाले का, याचीही माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे.
अवैध धंद्यांवर कारवाई होणार की केवळ कागदी कारवाई करून प्रकरणे थंडबस्त्यात जाणार? हा प्रश्न आता बारामतीकरांकडून उपस्थित केला जात असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414







