इंगळेवस्ती परिसरात कारवाई; गुटखा पुरवठ्याच्या ‘मुळापर्यंत’ पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान
बारामती : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात बारामती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बारामती अॅग्रो साखर कारखान्याजवळील इंगळेवस्ती परिसरात 16 ऑगस्ट 2026 रोजी छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह एकूण ₹1,02,160 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0388/2026 नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या FIRनुसार, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेशाने पथकाने इंगळेवस्ती परिसरात सापळा रचला. त्यावेळी स्कूटीवर पोत्यामध्ये माल घेऊन येणाऱ्या सागर मधुकर साळुंखे (वय 33, रा. मदनवाडी, भिगवण, ता. इंदापूर) याला ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी करण्यात आली.
नेमका किती माल सापडला?
FIRमध्ये नमूद केल्यानुसार कारवाईत—
₹19,998 किमतीचे 101 पुडे विमल पानमसाला
₹2,407 किमतीचे 99 पुडे V1 तंबाखू
₹336 किमतीचे 31 पुडे V1 तंबाखू
₹1,395 किमतीचे 31 पुडे तंबाखू
₹75,000 किमतीची बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटी
असा एकूण ₹1,02,160 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासणीसाठी नमुने घेऊन उर्वरित माल ताब्यात घेण्यात आल्याचे FIRमध्ये नमूद आहे.
पुरवठादार कोण? तपासाची दिशा महत्त्वाची
विशेष म्हणजे, जप्त केलेला गुटखा कोणी पुरवठा केला, याबाबत आरोपीकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे FIRमध्ये नमूद आहे. त्यामुळे केवळ वाहतूक करणाऱ्यावर कारवाई न करता गुटख्याचा पुरवठादार, वाहतूकदार आणि उत्पादक यांच्यापर्यंत तपास पोहोचणार का? हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे.
FIRमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा राज्यातील चोरटा व्यापार थांबविण्यासाठी पुरवठादार, वाहतूकदार व उत्पादक यांच्याबाबत सखोल तपास करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील विविध कलमे तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 272 व 273 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIRची नोंद 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7.17 वाजता झाल्याचे कागदपत्रात नमूद आहे.
‘मोठ्या नेटवर्क’चा शोध लागणार का?
बारामती परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, ₹1.02 लाखांचा माल पकडला गेला असला तरी या मालामागील संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस येते का, हे आगामी तपासातून स्पष्ट होणार आहे.
गुटखा विक्रीचा फक्त वाहक पकडला जाणार की पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोहोचून संपूर्ण नेटवर्कवर कारवाई होणार?
हा आता बारामतीकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414







