सासवड | प्रतिनिधी :
सासवड पोलिसांनी मोरया सोसायटी परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल, दोन मॅगझीन, सात जिवंत काडतुसे आणि तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला. या प्रकरणी शुभम राजपुरे (रा. मोरया सोसायटी, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी शुभम राजपुरे याच्या वाहनात पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने मोरया सोसायटी येथे त्याला ताब्यात घेतले. दोन पंचांच्या उपस्थितीत त्याच्या मारुती सुझुकी ब्रेझा वाहनाची झडती घेतली असता डॅशबोर्डखालील कप्प्यात गावठी बनावटीचे पिस्टल, दोन मॅगझीन व सात जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच काळ्या म्यानातील सुमारे तीन फूट लांबीची स्टीलची तलवारही मिळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹७ लाख ६६ हजार आहे. यामध्ये सुमारे ₹६० हजार किमतीचे गावठी पिस्टल, ₹९ हजार किमतीचे दोन मॅगझीन, सात जिवंत काडतुसे, ₹२ हजार किमतीची तलवार आणि सुमारे ₹७ लाख किमतीची मारुती सुझुकी ब्रेझा कार यांचा समावेश आहे.
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८७/२०२६ दाखल करण्यात आला असून शस्त्र अधिनियमातील कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपीविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, चोरी आणि शस्त्र अधिनियमासह १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये भादंवि कलम ३०७, ३०२, ३९२, ३९४, ३९५, ३८७ आदी गंभीर कलमांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता ४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.
— संतोष घोळवे, पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस ठाणे

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414













