मनन जहांगीर पाडवी, वंदनादेवी मनन पाडवी, अक्षय महादेव अहिवळे, सचिन बाळासाहेब डोंगरे व अक्षय गोमासे यांच्यासह एजंटांविरोधात कारवाई
बारामती | प्रतिनिधी :
दरमहा 20 ते 22 टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून रक्कम घेतल्याचा आरोप करत बारामती पोलिस ठाण्यात ₹63 लाख 2 हजारांच्या कथित फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIRमध्ये मनन जहांगीर पाडवी, वंदनादेवी मनन पाडवी, अक्षय महादेव अहिवळे, सचिन बाळासाहेब डोंगरे आणि अक्षय गोमासे यांच्यासह इतर एजंटांविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे.
FIRनुसार, संबंधितांकडून SPVS Group of Companiesच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या विविध योजना असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये दरमहा 20 ते 22 टक्के परतावा तसेच मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. सुरुवातीला ₹1 लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा ₹18 हजार परतावा मिळाल्याने विश्वास वाढल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा गुंतविल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, पुढील काळात ₹48.41 लाखांची गुंतवणूक करण्यात आली. यातील काही रक्कम कर्ज काढून गुंतविल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र जून 2023 पासून परतावा बंद झाल्याचा आणि मुदत संपल्यानंतरही मूळ रक्कम परत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, अन्य गुंतवणूकदारांकडूनही संबंधित कंपनी व व्यक्तींच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात आल्याचा दावा FIRमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ₹63,02,000 रकमेच्या गुंतवणुकीबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान, गुंतवणुकीची रक्कम परत मागितल्यानंतर धमकी दिल्याचाही आरोप तक्रारदाराने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, 1999 मधील कलम 3 व 4 तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 3(5), 318(4), 351(2) आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भगवान पार्वती ढुबे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे FIRमध्ये नमूद आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












