स्वातंत्र्यसैनिक संघटनांकडून आयोजन; सकाळी ११ वाजता हुतात्मा स्तंभ येथे कार्यक्रम
बारामती | प्रतिनिधी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात संघटनेने नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
महात्मा गांधीजी तसेच लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच धर्तीवर बारामतीतही दोन्ही महान राष्ट्रीय नेत्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता महात्मा गांधीजी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या राष्ट्रसेवा, त्याग आणि पुरुषार्थाचे स्मरण करून काही काळ मौन पाळण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा जयंती कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्तंभ, वंदेमातरम चौक (भिगवण चौक), बारामती येथे होणार आहे.
कार्यक्रमास बारामतीतील नागरिक, बारामती नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, सरकारी व निमसरकारी कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, पत्रकार, संपादक, बँक अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, कामगार संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाला राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414













