जमिनीच्या वारस नोंदीवरून वाद; सावत्र भाच्याविरुद्ध गंभीर आरोप
बारामती : जगताप मळा परिसरात जमिनीच्या वारस नोंदीवरून झालेल्या वादातून घरातील कपड्यांना पेट्रोल टाकून आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0350/2026 नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील कलम 326(g), 351(2), 351(3) व 352 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादी महिलेच्या जबाबानुसार, 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जमिनीला वारस म्हणून नावे का लागली नाहीत, या कारणावरून संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी कुटुंबातील एका महिलेने मध्यस्थी करून संबंधित व्यक्तीला तेथून पाठवून दिल्याचे जबाबात नमूद आहे.
यानंतर 30 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजता फिर्यादी घरात झोपलेली असताना अचानक उष्णता जाणवली आणि जळल्याचा वास आला. जागे होऊन पाहिले असता खाटेवरील कपड्यांना आग लागल्याचे दिसले. आरडाओरड केल्यानंतर घरातील इतर सदस्य जागे झाले आणि आग विझवून घराबाहेर पडल्याचे जबाबात म्हटले आहे.
घराच्या बाहेर संबंधित व्यक्ती उभी असल्याचे तसेच, “जमिनीला आमची नावे लावा, नाहीतर जीव घेईन,” अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर फिर्यादीने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आगीत घरातील व्यक्तींना शारीरिक दुखापत झाली नसल्याचेही जबाबात नमूद आहे.
एफआयआरनुसार, 30 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.54 वाजता गुन्ह्याची नोंद झाली असून, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












