बारामती | प्रतिनिधी :
बारामती शहरातील जळोची परिसरात किराणा दुकानात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ₹4 लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केल्याची घटना 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0414/2026 दाखल करण्यात आला आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 3(5) आणि 304(2) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेच्या जबाबानुसार, त्या जळोची येथील आपल्या किराणा दुकानात नातवासोबत असताना सायंकाळी सुमारे 7.30 वाजता दोन अनोळखी इसम दुकानात आले. त्यापैकी एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याने चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधला होता. त्यांनी दुकानातून काही वस्तू मागितल्यानंतर एका इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारून ते तोडले आणि साथीदारासह काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चोरीस गेलेल्या मंगळसूत्राचे वजन 39 ग्रॅम 750 मिली असून त्याची किंमत सुमारे ₹4 लाख असल्याची नोंद FIR मध्ये आहे.
विशेष म्हणजे, FIR मध्ये आरोपी म्हणून दोन अनोळखी व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. आरोपींची नावे अथवा पत्ते अद्याप उपलब्ध नसल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट होते.
गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सादिक दिलावर काझी, बकल क्रमांक 2974 यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आता नागरिकांचा सवाल — आरोपी कधी सापडणार?
घटनेला काही दिवस उलटून गेले असताना दोन अनोळखी आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले आहेत की नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दुकानात तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास त्यांचे फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविणे, मोटारसायकलचा माग काढणे आणि चोरीचे सोने कुठे विकले गेले याचा तपास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
₹4 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेणारे आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागणार? चोरीचा मुद्देमाल परत मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












