आनंद व विसावा हॉटेल परिसरातील लॉजवर गंभीर आरोप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, कारवाईची मागणी
दौंड : पुणे–सोलापूर महामार्गावरील खडकी–रावणगाव परिसरात काही हॉटेल व लॉजिंगमध्ये कथितपणे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विशेषतः आनंद हॉटेल अँड लॉजिंग तसेच विसावा हॉटेल परिसरातील काही लॉज याठिकाणी महिलांना व मुलींना आणून देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात असल्याचे आरोप करण्यात येत असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित ठिकाणी महिलांना व मुलींना आणणे, फोनच्या माध्यमातून ग्राहक उपलब्ध करून देणे, लॉजमधील खोल्यांचा कथितपणे गैरवापर करणे तसेच दलालांच्या माध्यमातून हा व्यवसाय चालविला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः हॉटेल आणि लॉजिंगच्या आडून अशा प्रकारचे गैरप्रकार होत असतील तर त्याची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
या प्रकाराबाबत आणखी एक गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे. एखाद्या ठिकाणी कथितपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी असताना प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार कसा येत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही नागरिकांमध्ये तर, संबंधित व्यवसायाला स्थानिक पातळीवर कोणाचे अभय आहे का? अशीही चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेची सत्यता तपासण्यासाठी पोलिस प्रशासनाने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.
दरम्यान, यापूर्वी भिगवण परिसरातही कथित अवैध देहविक्रीच्या व्यवसायाबाबत तक्रारी व आरोप समोर आले होते. त्यानंतर आता खडकी–रावणगाव परिसरातही अशाच स्वरूपाच्या तक्रारी चर्चेत आल्याने प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलिस प्रशासनाने चौकशी करून सत्य समोर आणावे
खडकी–रावणगाव परिसरातील हॉटेल व लॉजिंगची तपासणी करून तेथे कोणत्याही प्रकारचा अनैतिक किंवा बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे का, याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“तक्रारी व आरोप वारंवार समोर येत असताना प्रशासन नेमकी काय कारवाई करत आहे?” असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची सत्यता पोलिस तपासातूनच स्पष्ट होणार असून, संबंधित हॉटेल व लॉजिंग चालकांची बाजू तसेच पोलिस प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस प्रशासन काय कारवाई करते, याकडे दौंडकरांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












