बांदलवाडी आणि जळोची येथे छापे; देशी दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टीची दारू जप्त
बारामती | प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून, पोलिसांनी सलग दोन दिवस अवैध दारूविक्रीविरोधात स्वतंत्र कारवाया केल्या आहेत. बांदलवाडी आणि जळोची परिसरात केलेल्या कारवाईत देशी दारूच्या बाटल्या तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली असून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. 19 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी बारामती-इंदापूर रोडवरील बांदलवाडी परिसरात बेकायदेशीररीत्या देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पंचांसह छापा टाकण्यात आला. या कारवाईत लक्ष्मण बापू जोशी (वय 65, रा. बांदलवाडी) याच्या ताब्यातून ‘टँगो पंच’ नावाच्या 90 मिली क्षमतेच्या 18 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या, अंदाजे ₹720 किमतीच्या, जप्त करण्यात आल्या.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 394/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यापूर्वी दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी जळोची गावच्या हद्दीत बैलबाजाराच्या कडेला पत्र्याच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत रंजना सोमनाथ कुदळे (वय 45, रा. जळोची, बारामती) हिच्या ताब्यातून पांढऱ्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये अंदाजे 10 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, अंदाजे ₹1,000 किमतीची, आढळून आली. आवश्यक नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 389/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत आहेत.
या कारवाया पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, प्रभारी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी तसेच अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.
अवैध धंद्यांची माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
बारामती शहर पोलीस स्टेशनकडून नागरिकांना अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री, दारू गुत्ते, बेकायदेशीर ताडी विक्री, मटका-जुगार, अमली पदार्थांची विक्री, भेसळ, काळाबाजार तसेच शाळा-महाविद्यालय परिसरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि छेडछाडीच्या घटनांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी डायल 112, बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. परिस्थिती सुरक्षित असल्यासच फोटो किंवा व्हिडिओच्या स्वरूपात पुरावा द्यावा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
“अवैध धंद्यांना आश्रय नाही; माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई निश्चित,” असा इशारा बारामती शहर पोलिसांकडून देण्यात आला आहे. अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414










