दौंड | प्रतिनिधी
दौंड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या बौद्ध विहाराच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन युवा आघाडीचे दौंड तालुका अध्यक्ष विशाल अशोक शिंदे यांनी तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी १ सप्टेंबर २०२६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दौंड येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात २४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तहसीलदार, दौंड नगरपरिषदेसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वीही १३ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देऊन बांधकामाची तात्काळ स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदनानुसार, बौद्ध विहाराच्या बांधकामात वापरण्यात आलेले सिमेंट, वाळू, दगड, स्टील, काँक्रीट आदी साहित्य निर्धारित तांत्रिक मानकांनुसार आहे किंवा नाही, याची नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच बांधकामाचा मंजूर आराखडा, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक, निविदा कागदपत्रे, वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका (MB), बिलांची माहिती आणि आतापर्यंत झालेला खर्च सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बांधकामाच्या गुणवत्तेत त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदार, अधिकारी, अभियंता व जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी आहे.
बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्वतंत्र व नियमित गुणवत्ता तपासणी करण्यासाठी सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, तसेच पावसाळ्यातील वस्तुस्थितीच्या आधारे पंचनामा/पावसाळी अहवाल तयार करून तो तक्रारदारास देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विशाल शिंदे यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय व्यवस्था करावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.
ठळक मागण्या
बौद्ध विहाराचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून चौकशी करावी.
बांधकाम साहित्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करावी.
मंजूर आराखडा, अंदाजपत्रक, निविदा, वर्क ऑर्डर व MBची माहिती सार्वजनिक करावी.
अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी.
बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता तपासणी करावी.
कामाची गुणवत्ता समाधानकारक असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414










