नवीन ठेक्यात सध्या कार्यरत सर्व कामगारांना कायम ठेवण्याची मागणी; नगरपरिषदेसमोर सभा घेऊन निवेदन सादर
बारामती | प्रतिनिधी
बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सुरू झालेला हा मोर्चा बारामती नगरपरिषद कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर नगरपरिषदेसमोर सभा घेण्यात आली व विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रावहिनी पवार, तसेच बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना यापूर्वीही संघटनेच्या वतीने निवेदने देण्यात आली होती.
नवीन ठेक्यात सर्व कामगारांना कायम ठेवण्याची मागणी
नवीन ठेका देताना सध्या बारामती नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना कायम ठेवण्यात यावे आणि कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करू नये, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.
तसेच कामगारांना नियमानुसार किमान वेतन, पीएफ, ESIS, बोनस आणि साप्ताहिक सुट्टी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पीएफ व ESIS रकमेची चौकशी करण्याची मागणी
तत्कालीन ठेकेदारांनी कामगारांच्या पीएफ व ESISची रक्कम नियमानुसार जमा केली आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
चौकशीच्या वेळी संबंधित कामगारांचे म्हणणे ऐकून त्यांच्या कागदपत्रांचीही तपासणी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम परत देऊ नये आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
स्थानिक ठेकेदारांना संधी देण्याची मागणी
बारामतीतील स्थानिक ठेकेदारांना ठेका मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार नियम व अटी शिथिल करण्यात याव्यात. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
अपघाताचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात करू नये
कामगार कर्तव्यावर असताना वाहनाचा अपघात झाल्यास त्याचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात करू नये. संबंधित खर्च ठेकेदाराने करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
प्रत्येक कामगाराला वेतन पावती (पेमेंट स्लिप) देण्यात यावी आणि दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन अदा करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
कामावरून कमी करण्यापूर्वी नियमानुसार नोटीस द्यावी
कंत्राटी कामगाराला कामावरून कमी करताना नियमानुसार पूर्वसूचना व नोटीस देण्यात यावी. कामाच्या कालावधीत कामगाराचा अपघात झाल्यास त्याचा वैद्यकीय खर्च संबंधित ठेकेदाराने करावा. उपचार व रजेच्या कालावधीतील वेतनाबाबतही लागू नियमांनुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
सभेत विविध मान्यवरांची मनोगते
मोर्चानंतर नगरपरिषदेसमोर झालेल्या सभेत नगरसेवक आरती शेंडगे (गव्हाळे), सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी, अक्षय खरात, भारतीय युवा पँथर संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम गायकवाड आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
सभेनंतर बारामती नगरपरिषद अधिकाऱ्यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या हक्कांशी संबंधित मागण्यांची तातडीने दखल घेऊन नवीन कंत्राट प्रक्रियेत कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष शंकर शिंदे, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर, सहसंघटक स्वप्निल लोंढे, बारामती तालुकाध्यक्ष विशाल जगताप, तालुका कार्याध्यक्ष प्रेम खरात, बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, एमआयडीसी विभाग अध्यक्ष शहाजी बाळू कांबळे, उपाध्यक्ष भारती साबळे, उपाध्यक्ष स्वाती गायकवाड, कार्याध्यक्ष सरिता सरतापे, सहकार्याध्यक्ष सुप्रिया खरात, संघटक रेश्मा सावंत, सरचिटणीस निलेश काकडे, संपर्कप्रमुख शितल भोसले तसेच सदस्य नाना बगाडे, रितेश जाधव, विकास माने, विजय मस्के, बाप्पा तोरणे, अक्षय सरोदे उपस्थित होते.
याशिवाय भारतीय युवा पँथर संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष सुषमा पवार, सदस्य मंजुषा भंडारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414













