बारामती : कामाच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका कामगारावर लोखंडी धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केल्याची घटना बारामती तालुक्यातील वॉल कंपनीच्या गेटजवळ २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार विठ्ठल आत्माराम गावडे हे संबंधित कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करतात. काही दिवसांपूर्वी कामाच्या कारणावरून त्यांचा गणेश नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. २७ ऑगस्ट रोजी कामाच्या ठिकाणी पुन्हा त्यांच्यात वाद झाल्यानंतर गणेशने काम सोडण्यास सांगितले आणि नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ७ वाजता कंपनीच्या गेटबाहेर तक्रारदाराला गणेश व त्याचे दोन साथीदार दिसले. त्यापैकी एका व्यक्तीने मागून पकडून ठेवले, तर गणेशने दुचाकीवरून लोखंडी धारदार सत्तूर काढून तक्रारदाराच्या मानेवर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वार चुकवताना हात आडवा केल्याने हाताला जखम झाली असून रक्तस्त्राव झाल्याचेही नमूद आहे. त्यानंतर दुसऱ्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याशिवाय तक्रारदाराच्या NXG स्प्लेंडर दुचाकीचे वायरिंग व फायबरचे नुकसान करून आरसा फोडण्यात आला, तसेच त्यांच्या Samsung M12 मोबाईल फोनची हिसकावून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर तक्रारदार पोलिस ठाण्यात पोहोचले आणि वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर तक्रार दाखल केली.
या प्रकरणी शस्त्र अधिनियमातील कलम ४ व २५ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२), ११८(१), ११९(१), ३(५), ३२४(४), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, FIR नुसार आरोपी म्हणून गणेश व त्याचे दोन साथीदार नमूद आहेत.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












