इंदापूर | दि. ५ सप्टेंबर २०२६
इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ येथे प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन व विक्री केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात विजय संजीवन पाडुळे आणि हनुमंत जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR क्रमांक 0531/2026 असून गुन्हा 28 ऑगस्ट 2026 रोजी दाखल करण्यात आला.
FIR नुसार, कालठण नं. १ येथील गट नं. 98/4, क्षेत्र 1.20 हेक्टर असलेल्या विजय संजीवन पाडुळे यांच्या शेतजमिनीत चार शेततळी असून त्यापैकी दोन तळ्यांमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे संवर्धन होत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान तळ्यांमध्ये प्रतिबंधित मांगूर (Clarias gariepinus) जातीचे मासे आढळल्याचे FIR मध्ये नमूद आहे. पंचनामा करून अंदाजे 2,200 किलो प्रतिबंधित मांगूर मासे जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून शास्त्रोक्त पद्धतीने जागीच नष्ट करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
FIR मधील जबाबानुसार, मांगूर माशांचे बीज हनुमंत जाधव पुरवत असून मोठे झालेले मासे विक्रीसाठी नेले जात असल्याचे विजय पाडुळे यांनी सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तक्रारदार राजेंद्र रूपचंद राठोड, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, यांनी कायदेशीर तक्रार दिली. त्यानुसार पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 मधील कलम 3, 5 व 15, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 59 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राकेश हनुमंत फाळके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












