बारामती | प्रतिनिधी
बारामती शहरातील सिटी इन चौक परिसरातील सम्राट हॉटेलसमोर दुचाकीतील पेट्रोल संपल्याने थांबलेल्या १९ वर्षीय तरुणाला हॉटेलच्या मालकाने व एका वेटरने शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलमांसह भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता मानव विकास सोनवणे हा आपल्या दुचाकीने घरी जात असताना सिटी इन चौकातील सम्राट हॉटेलजवळ त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यानंतर त्याने मित्रांना घटनास्थळी बोलावले. त्याचा एक मित्र पेट्रोल आणण्यासाठी गेल्यानंतर मानव सोनवणे व त्याचा अन्य मित्र हॉटेलसमोर थांबले होते.
तक्रारीनुसार, यावेळी हॉटेलचा मालक तेथे आला आणि येथे का थांबला आहात, असे विचारत शिवीगाळ व धक्काबुक्की करून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदाराने आपले आडनाव सोनवणे असल्याचे सांगितल्यानंतर जातिवाचक अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर हॉटेलमधील एका वेटरला काठी आणण्यास सांगण्यात आल्याचे आणि त्या काठीनेही मारहाण झाल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.
तक्रारीत पुढे नमूद केल्यानुसार, वेटरने काठीने पाय, हात व गुडघ्यावर मारहाण केली. त्यानंतर डोक्यावर मारहाण करून गालावर चापट मारल्याचा तसेच रस्त्यावरून निघून जाण्यास सांगितल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तरुणाने मित्राला फोन करून बोलावले आणि त्याच्यासोबत घरी गेल्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी एफआयआर क्रमांक 0453/2026 असून, तो २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.१४ वाजता बारामती पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. तक्रारदार म्हणून मानव विकास सोनवणे यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. एफआयआरमध्ये संशयित आरोपी म्हणून सम्राट हॉटेलचे मालक आणि हॉटेलमधील एक वेटर यांचा उल्लेख आहे.
प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक चैतन्य वसंतराव कदम यांच्याकडे देण्यात आल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












