अपूर्ण व निकृष्ट बांधकामासह ₹11.19 लाखांच्या अंतिम बिलाची चौकशी करण्याची मागणी; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा परिषदेकडे निवेदन
इंदापूर | प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील तावशी येथे अनुसूचित जातींच्या वस्तीकरिता मंजूर झालेल्या अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंजूर यादीतील ठिकाण, प्रत्यक्ष बांधकामाचे ठिकाण, बांधकामाची गुणवत्ता तसेच अंतिम बिलाच्या अदा प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उपलब्ध प्रशासकीय कागदपत्रानुसार तावशी ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी बांधकामासाठी ₹11.25 लाखांची प्रशासकीय मान्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित मंजूर यादीतील अनुक्रमांक 65 मध्ये तावशी येथील अंगणवाडी केंद्राची नोंद असून, मंजूर ठिकाणाबाबत ‘हरिजनवस्ती’ असा शब्द कागदपत्रात वापरण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष बांधकाम जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्न
दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीचा संदर्भ देत निवेदनात इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इमारतीतील काही कामे अपूर्ण असून, भिंतींवर प्लास्टरचे काम पूर्ण नसणे, छताच्या भागातून पाणी गळतीची चिन्हे दिसणे तसेच एकूण बांधकामाची स्थिती मंजूर कामाच्या अपेक्षित अवस्थेशी विसंगत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, प्रत्यक्ष काम आणि अंदाजपत्रकातील कामांची तुलना करण्यासाठी मोजमाप पुस्तिका (MB), अंदाजपत्रक, बिल व तांत्रिक नोंदींची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक आहे.
₹11.19 लाखांच्या अंतिम बिलाची चौकशीची मागणी
तावशी ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी बांधकामासंदर्भातील Z.P. Bill Form No. 58 मध्ये कामाचा आदेश दिनांक 10 मार्च 2023 आणि प्रत्यक्ष पूर्णत्वाची नोंद 20 फेब्रुवारी 2024 अशी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ₹11,19,455/- रकमेचे प्रथम व अंतिम बिल अदा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी बांधकाम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने, अंतिम बिल कोणत्या मोजमापाच्या व कोणत्या पूर्णत्व प्रमाणपत्राच्या आधारे मंजूर करण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंजूर जागा बदलण्यासाठी परवानगी घेतली होती का?
अंगणवाडीच्या मंजूर ठिकाणात बदल करण्यात आला असल्यास त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव, सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आणि सुधारित प्रशासकीय अथवा तांत्रिक मान्यता घेण्यात आली होती का, याची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दलित वस्तीत जागा उपलब्ध असताना जागा बदलण्याचे कारण काय आहे जिल्हा परिषदे शाळेमध्ये पहिली स्वतंत्र अंगणवाडी असणार त्याच ठिकाणी शेजारीच दुसरी अंगणवाडी बांधायचे कारण काय आहे?
तसेच मंजूर निधीचा उद्देश, मंजूर ठिकाण आणि प्रत्यक्ष बांधकामाचे ठिकाण यामध्ये सुसंगती आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोणत्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी?
निवेदनात प्रशासनाकडे खालील कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे—
मंजूर अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता
तांत्रिक मान्यता व वर्क ऑर्डर
मूळ मोजमाप पुस्तिका (MB)
Running Account Bills व Final Bill
Completion Certificate
Quality Control Report
साहित्य चाचणी अहवाल
ग्रामपंचायत ठराव व कार्यवाही पुस्तक
जागेची मालकी/उपलब्धता प्रमाणपत्र
जागा बदलासंबंधी मंजुरी असल्यास संबंधित कागदपत्रे
कंत्राटदार व ग्रामपंचायतीतील करारपत्र
बिल अदा करण्यापूर्वीची तपासणी नोंद
प्रत्यक्ष कामाचे मोजमाप व छायाचित्रे
स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी
तावशी अंगणवाडीच्या बांधकामाची प्रत्यक्ष मोजणी आणि तांत्रिक तपासणी संबंधित कामाशी थेट संबंध नसलेल्या वरिष्ठ अभियंत्यांच्या पथकामार्फत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच सिमेंट, वाळू, खडी, स्टील, काँक्रीट, प्लास्टर आदी कामांची आवश्यकता असल्यास Quality Control/Material Testing करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काम अपूर्ण असताना जास्त रक्कम अदा झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास नियमांनुसार संबंधितांकडून रक्कम वसूल करावी आणि आर्थिक अनियमितता किंवा खोटी मोजमाप नोंद आढळल्यास कायदेशीर व विभागीय कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मंगलदास निकाळजे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे या प्रकरणाची केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष स्थळ पाहणी, तांत्रिक मोजमाप, आर्थिक लेखापरीक्षण आणि मंजूर जागेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुकाध्यक्ष किर्तिकुमार वाघमारे, सागर खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












