पोलिसांनी गुन्हा दाखल केला; तहसीलदारांकडून दंडात्मक कारवाई आणि वाहन जप्तीबाबत प्रश्नचिन्ह
बारामती | प्रतिनिधी
सुपा-कुतवळवाडी रस्त्यावर विनापरवाना गौण खनिज मुरूमाची वाहतूक केल्याच्या आरोपावरून सुपा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या FIR नुसार हायवा वाहनातून अंदाजे ४ ब्रास मुरूम, किंमत सुमारे १६ हजार रुपये आढळून आला. या प्रकरणात चालक प्रशांत ज्ञानदेव चौधरी आणि वाहनमालक सुरज रामदास भोंडवे यांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे.
१५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता सुपा पोलिसांचे पथक सुपा-कुतवळवाडी रस्त्यावर गस्तीवर असताना MH 42 BF 2115 क्रमांकाचा हायवा थांबवून तपासण्यात आला. त्यामध्ये अंदाजे ४ ब्रास मुरूम असल्याचे FIR मध्ये नमूद आहे. चालकाकडे गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसंदर्भातील परवाना अथवा कागदपत्रे नसल्याचेही फिर्यादीच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी खाण आणि खनिज (नियमन व विकास) अधिनियम, १९५७ मधील कलम ४ व २१ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR क्रमांक 0201/2026 असून तो १६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.३५ वाजता नोंदविण्यात आला.
पोलिसांची कारवाई झाली; मग महसूल विभागाची पुढील भूमिका काय?
या प्रकरणामुळे आता महसूल विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील गौण खनिजांबाबतच्या नियमांमध्ये अनधिकृत उत्खनन, वाहतूक आणि वापराविरोधात महसूल यंत्रणेकडून दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियमांतील तरतुदीनुसार, अनधिकृत गौण खनिज वाहतुकीसाठी वापरलेली वाहने/साधने जप्त झाल्यानंतर दंड आणि वैयक्तिक बंधपत्राच्या प्रक्रियेनंतरच त्यांची सुटका होऊ शकते.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(८) अंतर्गत अनधिकृतरीत्या काढलेले किंवा वाहून नेलेले खनिज जप्त करण्याची तरतूद आहे.
त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून पुढील जप्ती, दंड व इतर वैधानिक कार्यवाही नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाणार? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
तहसीलदार बारामतींकडून कारवाई होणार का?
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला, तरी गौण खनिजाच्या अनधिकृत वाहतुकीच्या प्रकरणात महसूल विभागाची भूमिका काय राहणार, वाहनाबाबत कोणती प्रक्रिया केली जाणार आणि शासनाच्या महसुलाची वसुली कोणत्या पद्धतीने होणार, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
सुपा पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर बारामती तहसील कार्यालय या प्रकरणाची स्वतंत्र दखल घेणार का? संबंधित हायवा वाहनाबाबत महसूल विभागाकडून जप्ती अथवा दंडात्मक कार्यवाही केली जाणार का? अनधिकृत मुरूमाचा स्रोत शोधण्यासाठी महसूल पथक प्रत्यक्ष पाहणी करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, FIR मध्ये पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश दिनानाथ साळुंखे यांच्याकडे सोपविल्याची नोंद आहे.
आता पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर महसूल प्रशासन कितपत पुढे येते आणि तहसीलदार बारामती यांच्याकडून कोणती वैधानिक कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांची कारवाई झाली; आता महसूल विभागाची कारवाई कधी? हा प्रश्न या प्रकरणातून ऐरणीवर आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – मंगलदास तुकाराम निकाळजे
मोबाईल नंबर – 8390041414












